डोंबिवलीतील आत्ते-मामे भावंडांवर काळाचा घाला   

मुंबई : पर्यटनासाठी डोंबिवलीतील आत्ते-मामे भावंडे जम्मू-काश्मीरला गेली. मात्र, त्यांची ही सहल अखेरची ठरली. हेमंत जोशी, अतुल मोने, संजय लेले या डोंबिवलीतील तिन्ही भावंडांवर दहशतवाद्यांनी तिहेरी घाला घातला. डोंबिवलीतील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरात हे तिघेही वास्तव्यास होते.
 
मुलाची दहावीची परीक्षा संपली अन् सुट्ट्यांसाठी म्हणून डोंबिवलीतील हेमंत जोशी (वय ४५) हे पत्नी मोनिका जोशी (४५) आणि मुलगा ध्रुव जोशी (१६) यांच्यासह जम्मू-काश्मीर सहलीसाठी गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक अतुल मोने, पत्नी अनुष्का मोने (३५) मुलगी रुचा मोने (१८) तसेच संजय लेले (५०) यांची पत्नी कविता लेले (४६) आणि मुलगा हर्षल लेले (२०) हे देखील होते. 
 
पहलगामच्या बैसरन व्हॅलीत पर्यटनाचा आनंद घेत असताना मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास लष्कराच्या गणवेशात आलेल्या चार दहशतवाद्यांनी नावे आणि धर्म विचारून बेछूट गोळीबार केला. यात २८ पर्यटकांचा नाहक बळी गेला. यामध्ये डोंबिवलीतील हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या आत्ते-मामे भावंडांचा समावेश आहे. या तिघांनाही आपल्या पत्नी आणि मुलांसमोर गोळ्या घालण्यात आल्या. हे तिघेही गंभीर जखमी होते. त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  
 
या घटनेमुळे लेले, मोने आणि जोशी कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, डोंबिवलीत हळहळ व्यक्त होत आहे. हेमंत जोशी हे एका खासगी फायनान्स कंपनीत काम करत होते तर त्यांच्या पत्नी मोनिका जोशी या खासगी कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करतात. डोंबिवलीमधील भागशाळा मैदानासमोरील सावित्री इमारतीमध्ये हे कुटुंब राहत होते. अतुल मोने हे मध्य रेल्वेच्या परळ येथील कार्यशाळेत विभागीय अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांचे कुटुंब डोंबिवली पश्चिम भागात वास्तव्यास आहे. तर संजय लेले हे डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील जाधववाडी भागात राहत होते. ते एका फार्मा कंपनीत नोकरी करत होते. लेले यांचा मुलगा हर्षल या हल्ल्यात जखमी झाला आहे. एक गोळी त्याच्या हाताला चाटून गेली. 
 
दरम्यान, हल्ला झाल्याचे वृत्त माध्यमांवर झळकताच या तिन्ही कुटुंबियांच्या नातेवाईकांनी या तिघांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र हे तिघेही दहशतवादी हल्ल्याचे बळी ठरल्याचे समजताच नातेवाईकांच्या पायाखालची जमीन सरकली. 

बातमी पाहून पायाखालची जमीन सरकली

संजय हा आमच्यासमोरच लहानाचा मोठा झाला. या सोसायटीत वाढला. संजयच्या निधनाची बातमी पाहून आमच्याही पायाखालची जमीन सरकली. आमचे नेहमीचे घरातले कौटुंबिक संबंध होते, अशा भावना डोंबिवली येथील सोसायटीमधील के. डी उंडे यांनी व्यक्त केल्या.  
 

Related Articles